रामनगर पोलिसांची कारवाई; देशी दारूसह चारचाकी वाहन जप्त

Mon 29-Jun-2026,02:32 AM IST -07:00
Beach Activities

रामनगर पोलिसांची कारवाई; देशी दारूसह चारचाकी वाहन जप्त

5 लाख 40 हजारांचा मुद्देमाल हस्तगत, एका आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा 

रामनगर पोलीस ठाण्याच्या दारूबंदी पथकाने रात्रीच्या गस्ती दरम्यान नाकाबंदी करून अवैधरित्या देशी दारूची वाहतूक करणाऱ्या चारचाकी वाहनावर कारवाई करत 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार, 26 जून रोजी पहाटे बुद्ध टेकडीजवळील देशमुख नगरी परिसरात नाकाबंदी करण्यात आली. यावेळी संशयित चारचाकी वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये विक्रीसाठी आणण्यात आलेल्या 90 मिलीच्या टॅंगो पंच देशी दारूच्या 400 बाटल्या आढळून आल्या.

या प्रकरणी प्रणय ऊर्फ आकाश राजेंद्र फुलझेले (वय 28, रा. सेवाग्राम रोड, वर्धा) याला ताब्यात घेण्यात आले. पोलिसांनी सुमारे 40 हजार रुपयांची देशी दारू तसेच एमएच-27-बीई-0062 क्रमांकाची अंदाजे 5 लाख रुपयांची मारुती सुझुकी स्विफ्ट डिझायर कार जप्त केली. एकूण 5 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला.

याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात महाराष्ट्र दारूबंदी कायदा तसेच मोटार वाहन कायद्यातील संबंधित कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली रामनगर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षक पौर्णिमा राखोंडे यांच्या नेतृत्वात दारूबंदी पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केली.