वडनेर पोलिसांतर्फे दारोडा टोल प्लाझावर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी जनजागृती दिन साजरा

Mon 29-Jun-2026,03:13 AM IST -07:00
Beach Activities

वडनेर पोलिसांतर्फे दारोडा टोल प्लाझावर आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी जनजागृती दिन साजरा

व्यसनमुक्त समाजासाठी नागरिकांना जागरूक राहण्याचे आवाहन

वडनेर | प्रतिनिधी नाजिम खान 

वडनेर अंमली पदार्थांच्या वाढत्या विळख्यापासून तरुणाईला वाचविणे आणि व्यसनमुक्त समाजाची निर्मिती करण्याच्या उद्देशाने वडनेर पोलीस स्टेशनच्या वतीने दारोडा टोल प्लाझा येथे 'आंतरराष्ट्रीय अंमली पदार्थविरोधी व अवैध तस्करीविरोधी दिन' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमाद्वारे वाहनचालक आणि नागरिकांमध्ये अंमली पदार्थांच्या दुष्परिणामांबाबत जनजागृती करण्यात आली.

कार्यक्रमाला वडनेर पोलीस स्टेशनचे ठाणेदार घनश्याम पाटील तसेच दारोडा टोल प्लाझाचे व्यवस्थापक मलकीत सिंह प्रमुख उपस्थित होते.

यावेळी मार्गदर्शन करताना ठाणेदार घनश्याम पाटील यांनी अंमली पदार्थांचे व्यसन हे समाजासमोरील गंभीर आव्हान असल्याचे सांगितले. व्यसनामुळे व्यक्तीचे शारीरिक व मानसिक आरोग्य बिघडते, तसेच संपूर्ण कुटुंबावर त्याचे विपरीत परिणाम होतात. त्यामुळे युवकांना या घातक व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी पालक, समाज आणि विविध संस्थांनी एकत्रितपणे जनजागृती करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले.

दारोडा टोल प्लाझाचे व्यवस्थापक मलकीत सिंह यांनीही पोलिसांच्या या जनहिताच्या उपक्रमाचे कौतुक करत व्यसनमुक्त समाज घडविण्यासाठी प्रत्येक नागरिकाने पुढाकार घेण्याचे आवाहन केले.

या जनजागृती कार्यक्रमात दारोडा टोल प्लाझाचे कर्मचारी, वाहनचालक तसेच नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी वडनेर पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी तसेच टोल प्लाझा प्रशासनाने विशेष परिश्रम घेतले.