भर पावसात ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

Sat 04-Jul-2026,01:24 AM IST -07:00
Beach Activities

भर पावसात ऑनलाइन परीक्षेविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार; जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

ऑनलाइन परीक्षेच्या निर्णयाविरोधात वर्धा शहरात विद्यार्थ्यांनी भर पावसात रस्त्यावर उतरून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शासनाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला. ऑनलाइन परीक्षा रद्द करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांनी जोरदार घोषणाबाजी केली.

छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोर्चाला सुरुवात झाली. मुख्य बाजारपेठ मार्गे जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचलेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. आंदोलनकर्त्यांनी ऑनलाइन परीक्षा विद्यार्थ्यांच्या हिताची नसल्याचा दावा करत हा निर्णय तातडीने मागे घेण्याची मागणी केली.

यावेळी कराळे मास्तर यांनी विद्यार्थ्यांना संबोधित करत शासनाने ऑनलाइन परीक्षेचा निर्णय त्वरित मागे घ्यावा, अन्यथा राज्यभर तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा दिला.

मोर्चादरम्यान कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यासाठी पोलिस प्रशासनाकडून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत मोर्चा शांततेत जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचला. त्यानंतर शासनाच्या नावाने निवेदन सादर करण्यात आले.

भर पावसातही विद्यार्थ्यांचा उत्साह, एकजूट आणि निर्धार कायम असल्याचे या आंदोलनातून दिसून आले. शासनाने विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घ्यावा, अन्यथा राज्यव्यापी आंदोलन उभारण्यात येईल, असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला. आंदोलनाची सांगता शांततेत झाली.