अनुशासन, देशभक्ती आणि स्वसंरक्षणाचा दिला संदेश

Mon 06-Jul-2026,10:06 PM IST -07:00
Beach Activities

अनुशासन, देशभक्ती आणि स्वसंरक्षणाचा दिला संदेश

एनसीसी विशेष प्रशिक्षण शिबिराला पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांची सदिच्छा भेट; कॅडेटांशी साधला संवाद

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा दि. ६ जुलै २०२६ एनसीसी कॅडेटांमध्ये देशभक्ती, शिस्त, नेतृत्वगुण आणि सामाजिक जबाबदारीची भावना विकसित करण्याच्या उद्देशाने सेवाग्राम येथील स्व. बापूरावजी देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयात आयोजित राष्ट्रीय कॅडेट कोर (एनसीसी) विशेष प्रशिक्षण शिबिराला जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी सदिच्छा भेट देत कॅडेटांशी संवाद साधला.

सकाळी ११ वाजता आयोजित कार्यक्रमात पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी एनसीसी कॅडेटांच्या शिस्तप्रिय वृत्ती, समर्पण आणि उत्साहाचे कौतुक केले. एनसीसी ही केवळ प्रशिक्षण देणारी संस्था नसून, देशासाठी जबाबदार, अनुशासित आणि सजग नागरिक घडविणारे प्रभावी व्यासपीठ असल्याचे त्यांनी सांगितले. शिबिरातून मिळणारे शिस्तीचे संस्कार, वेळेचे नियोजन आणि नेतृत्व कौशल्य जीवनातील प्रत्येक क्षेत्रात यश मिळविण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरतात, असेही त्यांनी नमूद केले.

यावेळी त्यांनी वर्धा जिल्हा पोलीस दलामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध जनजागृती व लोककल्याणकारी उपक्रमांची माहिती दिली. अलीकडेच महिला पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी आयोजित स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिराचा उल्लेख करत, लवकरच एनसीसी कॅडेट तसेच शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींसाठीही विशेष स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिरे आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या उपक्रमामुळे युवक-युवतींमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच सुरक्षेविषयी जागरूकता निर्माण होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

पोलीस अधीक्षक अग्रवाल यांनी कॅडेटांना सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याचे, सोशल मीडियाचा जबाबदारीने वापर करण्याचे तसेच कायद्याबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले. राष्ट्रनिर्माणामध्ये युवकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असून, एनसीसी कॅडेटांनी समाजासाठी आदर्श नागरिक बनण्याचा संकल्प करावा, असेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला एनसीसीचे कमांडिंग ऑफिसर, लष्करी प्रशिक्षण अधिकारी, महाविद्यालयाचे प्रतिनिधी, पोलीस विभागातील अधिकारी तसेच मोठ्या संख्येने एनसीसी कॅडेट उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी कॅडेटांच्या वतीने पोलीस अधीक्षकांचे आभार मानण्यात आले.