जुडिओ शोरूमबाहेर थरार!

Mon 06-Jul-2026,10:20 PM IST -07:00
Beach Activities

जुडिओ शोरूमबाहेर थरार!

पार्क केलेल्या कारच्या बोनेटमध्ये शिरला सात फूट लांबीचा धामण; तासभराच्या प्रयत्नांनंतर सर्पमित्राने केली सुरक्षित सुटका

वर्धा | प्रतिनिधी नाजिम खान 

वर्धा शहरातील महिला आश्रम परिसरातील जुडिओ (Zudio) शोरूमसमोर सोमवारी एक थरारक घटना घडली. खरेदीसाठी आलेल्या ग्राहकाच्या कारच्या बोनेटमध्ये तब्बल सात फूट लांबीचा धामण साप शिरल्याने परिसरात काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. या घटनेमुळे पार्किंग परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.

वडनेर येथील रहिवासी पत्रकार नाजिम पठाण हे आपल्या स्विफ्ट डिझायर कारने वर्धा येथे आले होते. त्यांनी जुडिओ शोरूमच्या पार्किंगमध्ये कार उभी करून खरेदीसाठी शोरूममध्ये प्रवेश केला. त्याचवेळी एक मोठा धामण साप कारच्या बोनेटमध्ये शिरल्याचे काही नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यांनी तातडीने कारमालकाला याची माहिती दिली.

सुमारे सात फूट लांबीचा साप कारमध्ये शिरल्याचे समजताच परिसरात एकच खळबळ उडाली. अनेकांनी घटनास्थळी गर्दी करून साप पाहण्यासाठी धाव घेतली. त्यामुळे काही काळ पार्किंग परिसरात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले.

घटनेची माहिती मिळताच सर्पमित्राला पाचारण करण्यात आले. जवळपास एक तासाच्या अथक प्रयत्नांनंतर सर्पमित्राने अत्यंत शिताफीने कारच्या बोनेटमध्ये लपून बसलेल्या धामण सापाला सुखरूप बाहेर काढले. त्यानंतर उपस्थित नागरिकांसह कारमालकाने सुटकेचा निश्वास सोडला.

या घटनेत कोणालाही कोणतीही दुखापत झाली नसून धामण सापाला सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आल्याची माहिती मिळाली. पावसाळ्याच्या दिवसांत सापांचा वावर वाढत असल्याने नागरिकांनी वाहन सुरू करण्यापूर्वी तसेच घर किंवा परिसरात साप आढळल्यास घाबरून न जाता तातडीने सर्पमित्र किंवा वन विभागाशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येत आहे.