मर्यादित कुटुंब हेच सुखी कुटुंबाचे मूळ – डॉ. सुमंत वाघ

Wed 15-Jul-2026,04:39 AM IST -07:00
Beach Activities जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम

मर्यादित कुटुंब हेच सुखी कुटुंबाचे मूळ – डॉ. सुमंत वाघ

जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयात जनजागृती कार्यक्रम

वर्धा | जिल्हा विशेष प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा वर्धा, जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त जिल्हा रुग्णालय, वर्धा येथे कुटुंब नियोजन व लोकसंख्या स्थिरतेबाबत जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी "मर्यादित कुटुंब हेच सुखी कुटुंबाचे मूळ आहे," असे प्रतिपादन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुमंत वाघ यांनी केले.

यावेळी बोलताना डॉ. वाघ म्हणाले की, आजच्या आधुनिक युगात वाढत्या लोकसंख्येवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि कुटुंबाचे आरोग्य उत्तम राखण्यासाठी कुटुंब नियोजन ही काळाची गरज बनली आहे. कुटुंब नियोजनाच्या विविध आधुनिक पद्धतींचा अवलंब केल्यास मुलांच्या आरोग्य, शिक्षण आणि उज्ज्वल भविष्यासाठी अधिक वेळ, लक्ष आणि आर्थिक साधने उपलब्ध होतात.

यावर्षीच्या जागतिक लोकसंख्या दिनाचा उद्देश केवळ लोकसंख्या नियंत्रण नसून प्रत्येक नागरिकाला दर्जेदार आरोग्यसेवा, शिक्षण आणि उपलब्ध संसाधनांचा समान व योग्य लाभ मिळावा हा आहे. जिल्हा रुग्णालयासह जिल्ह्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये कुटुंब नियोजनासंदर्भातील विविध आधुनिक सुविधा, उपचार आणि समुपदेशन सेवा मोफत उपलब्ध असून नागरिकांनी कोणताही संकोच न बाळगता त्याचा लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

लोकसंख्येची स्थिरता राखणे ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाचे सामाजिक कर्तव्य आहे. निरोगी, सुखी आणि समृद्ध समाजाच्या निर्मितीसाठी प्रत्येक कुटुंबाने कुटुंब नियोजनाचा स्वीकार करावा, असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने यावेळी करण्यात आले.

या कार्यक्रमास जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी तसेच आरोग्य विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.