३१ जुलैपर्यंत विकासकामे पूर्ण न झाल्यास AIMIMचे नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन

Mon 27-Jul-2026,09:51 PM IST -07:00
Beach Activities

३१ जुलैपर्यंत विकासकामे पूर्ण न झाल्यास AIMIMचे नगर परिषदेसमोर तीव्र आंदोलन

नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांची आसिफ खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने घेतली भेट

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा : प्रभाग क्रमांक १८ मधील डॉ. झाकीर हुसेन कॉलनी आणि पाकीजा कॉलनी परिसरातील प्रलंबित व अपूर्ण विकासकामांच्या प्रश्नावर ऑल इंडिया मजलिस-ए-इत्तेहादुल मुस्लिमीन (AIMIM)च्या वतीने जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सोमवारी (दि. २७ जुलै २०२६) नगराध्यक्ष तसेच मुख्याधिकारी, नगर परिषद वर्धा यांची भेट घेतली.

यावेळी परिसरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध समस्यांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. डॉ. झाकीर हुसेन कॉलनी व पाकीजा कॉलनी परिसरातील अनेक विकासकामे अद्यापही अपूर्ण असून, त्यामुळे नागरिकांना मोठ्या गैरसोयींचा सामना करावा लागत असल्याचे शिष्टमंडळाने प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले. या समस्यांबाबत यापूर्वी अनेक वेळा लेखी तसेच तोंडी निवेदने देऊनही अपेक्षित कार्यवाही न झाल्याबद्दल शिष्टमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केली.

AIMIMच्या वतीने नगराध्यक्ष व मुख्याधिकाऱ्यांना स्पष्ट इशारा देण्यात आला की, दि. ३१ जुलै २०२६ पर्यंत प्रभाग क्रमांक १८ मधील सर्व प्रलंबित व अपूर्ण विकासकामे सुरू करून ती पूर्ण करण्यासाठी ठोस कार्यवाही करण्यात आली नाही, तर शुक्रवार, दि. ३१ जुलै रोजी नगर परिषद कार्यालयासमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल.

नागरिकांच्या न्याय्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात येणार असून, आंदोलनादरम्यान निर्माण होणाऱ्या कोणत्याही परिस्थितीस संबंधित प्रशासन व विभाग जबाबदार राहील, असा इशाराही यावेळी देण्यात आला.

प्रशासनाने तातडीने सकारात्मक भूमिका घेत प्रभागातील नागरिकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, अशी मागणी AIMIM वर्धा जिल्ह्याच्या वतीने करण्यात आली. मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास लोकशाही मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी दिला.