दारोडा टोल प्लाझावर वाहनचालकांसाठी ‘अभय हेल्थ कॅम्प’

Mon 27-Jul-2026,10:04 PM IST -07:00
Beach Activities

दारोडा टोल प्लाझावर वाहनचालकांसाठी ‘अभय हेल्थ कॅम्प’

एक लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा; डोळ्यांची तपासणी करून गरजू चालकांना मोफत चष्म्यांचे वाटप

वडनेर | प्रतिनिधी नाज़िम खान 

वडनेर : राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या (NHAI) माध्यमातून दारोडा टोल प्लाझा येथे ट्रकचालक तसेच परवानाधारक वाहनचालकांसाठी ‘अभय हेल्थ कॅम्प’ या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हे आरोग्य शिबिर पुढील सहा महिने २४ तास सुरू राहणार असून, सर्व वाहनचालकांनी या सुविधेचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन कॅम्प व्यवस्थापक ओंकार दिंडे यांनी केले आहे.

विविध आजारांची मोफत तपासणी व चष्म्यांचे वाटप

दिवस-रात्र महामार्गावर वाहन चालविणाऱ्या चालकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी या शिबिरात रक्तदाब (बीपी), रक्तातील साखर (शुगर) आणि वजनाची मोफत तपासणी करण्यात येत आहे. तसेच वाहनचालकांसाठी अत्यंत महत्त्वाची असलेल्या दृष्टीची तपासणी करून गरजू चालकांना मोफत चष्म्यांचे वाटपही केले जात आहे. याशिवाय, वाहनचालकांना तज्ज्ञ डॉक्टरांशी थेट संवाद साधून वैद्यकीय सल्ला घेण्याची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे.

तज्ज्ञ डॉक्टरांची टीम देत आहे सेवा

कॅम्प व्यवस्थापक ओंकार दिंडे यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर गोपी सर (एमबीबीएस), डॉक्टर विशाल कलोडे (एमबीबीएस, एमएस सर्जन), डॉक्टर दीपाली लिचडे यांच्यासह संपूर्ण वैद्यकीय पथक वाहनचालकांची आरोग्य तपासणी करून त्यांना आवश्यक उपचार व मार्गदर्शन करीत आहे.

आरोग्य तपासणी करून घेणाऱ्या प्रत्येक वाहनचालकासाठी कूपनद्वारे मोफत जेवणाची सुविधाही उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच शिबिरात सहभागी होणाऱ्या चालकांना एक लाख रुपयांपर्यंतचा मोफत विमा संरक्षणाचा लाभ दिला जात आहे.

दारोडा टोल प्लाझा येथे पुढील सहा महिने हे शिबिर २४ तास सुरू राहणार असल्याने, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या सर्व वाहनचालकांनी, विशेषतः ट्रकचालकांनी आरोग्य तपासणी करून घेऊन या मोफत सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.