दारूच्या नशेत मुलाकडून आईवर जीवघेणा हल्ला,उपचारादरम्यान मृत्यू
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : जिल्ह्यातील गोंडपिपरी तालुक्यातील कोरंबी येथे मद्यधुंद अवस्थेत मुलाने स्वतःच्या आईच्या डोक्यात लाकडी काठीने प्राणघातक वार केल्याची हृदयद्रावक घटना घडली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा मारोती मोहुर्ले (वय ५०) यांचा नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी गोंडपिपरी पोलिसांनी आरोपी मुलगा सुरज मारोती मोहुर्ले (वय ३२) याला अटक केले आहे.
प्राप्त माहितीनुसार, २६ जुलै २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ ते ७.३० वाजण्याच्या दरम्यान सुरज मारोती मोहुर्ले हा मद्यधुंद अवस्थेत घरी आला. घरात बनवलेल्या भाजीवरून त्याचा धाकटा भाऊ विकास मारोती मोहुर्ले याच्याशी वाद झाला.
वादाचे रूपांतर शिवीगाळ व धक्काबुक्कीत झाले.
घरातील वाद वाढत असल्याचे पाहून आई प्रतिभा मोहुर्ले यांनी विकास याला घराबाहेर जाण्यास सांगितले. त्यानंतर त्या स्वतःही घराबाहेर आल्या. यावेळी संतापलेल्या सुरज मोहुर्ले याने हातात लाकडी काठी घेऊन घराबाहेर येत आरडाओरडा सुरू केला. आईने त्याला शांत करण्याचा प्रयत्न करताच त्याने रागाच्या भरात त्यांच्या डोक्यावर लाकडी काठीने जोरदार प्रहार केला. गंभीर जखमी झालेल्या प्रतिभा मोहुर्ले या रक्ताच्या थारोळ्यात रस्त्यावर कोसळल्या.
कुटुंबीयांनी त्यांना तातडीने गोंडपिपरी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. त्यानंतर चंद्रपूर जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले. प्रकृती चिंताजनक असल्याने पुढील उपचारासाठी नागपूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात (मेडिकल कॉलेज) रेफर करण्यात आले. मात्र उपचार सुरू असतानाच २८ जुलै २०२६ रोजी सकाळी सुमारे ६ वाजता त्यांचा मृत्यू झाला.
या घटनेप्रकरणी विकास मारोती मोहुर्ले यांनी दिलेल्या तक्रारीवरून गोंडपिपरी पोलिसांनी आरोपी सुरज मारोती मोहुर्ले याला तात्काळ अटक केली. त्याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (बीएनएस) कलम १०३(१) व ३५२ अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास गोंडपिपरी पोलीस ठाण्याचे ठाणेदार रमेश हत्तीगोटे करीत आहेत.
कौटुंबिक वादातून घडलेल्या या दुर्दैवी घटनेमुळे कोरंबी गावात शोककळा पसरली असून, मद्याच्या व्यसनामुळे एका कुटुंबाची झालेली अपरिमित हानी परिसरात चर्चेचा विषय ठरत आहे.