दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्थेच्या आरमोरी शाखेत स्वातंत्र्यदिन व ३३ वा वर्धापनदिन उत्साहात
जिल्हा प्रतिनिधी -विभा बोबाटे गडचिरोली
आरमोरी : दि गडचिरोली नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित, शाखा आरमोरीच्या वतीने ८० वा स्वातंत्र्यदिन तसेच संस्थेचा ३३ वा वर्धापनदिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त संस्थेच्या आरमोरी शाखेत संचालक दिलीप पाटील खेवले यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मधुकर धंदरे, विजय सुपारे, ताराचंद नागदेवे, आत्माराम डोकरमारे, बिपीन राऊत, मधुकर कोटांगले, रणजीत बनकर, देशमुख यांच्यासह संस्थेचे ग्राहक, अभिकर्ते, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यदिन आणि संस्थेच्या ३३ व्या वर्धापनदिनाचे औचित्य साधून संस्थेच्या माध्यमातून उत्कृष्ट सेवा देणाऱ्या ग्राहकांचा तसेच अभिकर्त्यांचा गौरव करण्यात आला. यावेळी उत्कृष्ट सेवाभावी ग्राहक म्हणून दौलत कुथे, तर उत्कृष्ट अभिकर्ता म्हणून कैलास खोब्रागडे यांची निवड करून उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांना चषक व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले.
संस्थेच्या ग्राहकांशी असलेले जिव्हाळ्याचे संबंध, ग्राहकांना दिली जाणारी सेवा आणि संस्थेच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या व्यक्तींचा गौरव करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला. सन्मानामुळे दौलत कुथे व कैलास खोब्रागडे यांचे उपस्थितांकडून अभिनंदन करण्यात आले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाखा व्यवस्थापक ताराचंद वाघरे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी, अभिकर्ते व उपस्थित नागरिकांनी सहकार्य केले. शेवटी नरेश नवघडे यांनी उपस्थितांचे आभार मानले.