जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत हिंगणघाटच्या खेळाडूंची चमक
जिल्हास्तरीय वुशु स्पर्धेत हिंगणघाटच्या खेळाडूंची चमक
बी.सी.सी. स्पोर्टिंग क्लबला ३ सुवर्ण, ९ रौप्यपदकांची कमाई
प्रतिनिधी : मंगेश लोखंडे, हिंगणघाट
वर्धा : एमेच्योर वुशु स्पोर्ट्स असोसिएशन, वर्धाच्या वतीने रविवार, २० सप्टेंबर रोजी यशवंत महाविद्यालय सभागृह, सेवाग्राम रोड, वर्धा येथे प्रथम जिल्हास्तरीय एमेच्योर वुशु स्पर्धा-२०२६ उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. सकाळी ११ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यातील विविध भागांतील खेळाडूंनी सहभाग घेत आपल्या कौशल्याचे प्रदर्शन केले.
स्पर्धेच्या अध्यक्षस्थानी यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर सुरेशराव देशमुख होते. यशवंत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. गिरीश वि. ठाकरे आणि इमरान राही यांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी विजय सत्यम, किरण फुलजेले, राष्ट्रीय क्रीडा संस्थेचे प्रशिक्षक राजेंद्र शेंद्रे, श्रीराम आठवले, असोसिएशनचे अध्यक्ष उल्हास वाघ, उपाध्यक्ष नदीम शेख, सचिव सुभाष उरकुडे यांच्यासह मान्यवर व क्रीडा मार्गदर्शक उपस्थित होते.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजक विक्रांत गव्हाणे आणि नदीम शेख यांचे उपस्थित मान्यवरांनी अभिनंदन केले. विविध गटांतील सामन्यांमध्ये खेळाडूंनी उत्कृष्ट तंत्र, शिस्त आणि क्रीडाकौशल्याचे प्रदर्शन केले.
बी.सी.सी. स्पोर्टिंग क्लबची उल्लेखनीय कामगिरी
हिंगणघाट येथील बी.सी.सी. स्पोर्टिंग क्लबच्या खेळाडूंनी स्पर्धेत दमदार कामगिरी करत ३ सुवर्ण आणि ९ रौप्यपदकांची कमाई केली. सर्व खेळाडूंना प्रशिक्षक सेंसेई नदीम शेख यांचे मार्गदर्शन लाभले.
सुवर्णपदक विजेते :
हर्षल मोहितकर, तेजस्विनी निमसरकार, वरुण गंधे.
रौप्यपदक विजेते :
रहमान शेख, सोहम जनबंधू, प्रथमेश घातुर्डे, अफनान शेख, तरंग मोहरले, राहुलकुमार रॉय, तन्मय येल्लोरे, विराज कुडवे, संकेत ठाकरे.
सर्व पदक विजेत्या खेळाडूंचा मान्यवरांच्या हस्ते पदक देऊन गौरव करण्यात आला. खेळाडूंच्या या यशाबद्दल बी.सी.सी. स्पोर्टिंग क्लबचे प्रशिक्षक सेंसेई नदीम शेख, क्लबचे पदाधिकारी, पालक तसेच क्रीडाप्रेमींनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
जिल्हास्तरीय या स्पर्धेमुळे वर्धा जिल्ह्यातील वुशु खेळाडूंना आपली प्रतिभा सादर करण्यासाठी महत्त्वाचे व्यासपीठ उपलब्ध झाले.