पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न

Wed 21-Oct-2026,09:32 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

 हिंगोली : वसमत पूर्णा सहकारी साखर कारखाना लि. वसमतनगर, जि. हिंगोली येथे गळीत हंगाम २०२६-२७ च्या ४६ व्या गळीत हंगामाचा ‘गव्हाण पूजन समारंभ’ बुधवार, दि. २१ ऑक्टोबर २०२६ रोजी सकाळी १०.२१ वाजता कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडे गांवकर यांच्या अध्यक्षतेखाली उत्साहात संपन्न झाला. यावेळी कारखान्याचे शासन नियुक्त संचालक मा.रामकिशन दत्तात्रय रोंदळे व कामगार प्रतिनिधी मा. रघुनाथ निवृत्तीराव डाखोरे यांच्या शुभहस्ते गव्हाण पूजन करण्यात आले.

यावेळी शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष मा. शहाजीराव देसाई यांनी शेतकऱ्यांना आपला ऊस पूर्णा सहकारी साखर कारखान्यास गाळपासाठी देण्याचे आवाहन केले. तसेच शासन नियुक्त संचालक रामकिशन रोंदळे व कामगार प्रतिनिधी रघुनाथराव डाखोरे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सर्व सभासदांनी आपला ऊस कारखान्यालाच द्यावा, असे आवाहन केले. यावेळी कारखान्याचे कामगार व व्यवस्थापन यांच्यातील समन्वयाबाबतही माहिती देण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना कारखान्याचे अध्यक्ष जयप्रकाश दांडे गांवकर यांनी सभासद व शेतकऱ्यांनी आपला ऊस पूर्णा सहकारी साखर कारखान्यास देऊन सहकार्य करावे, असे आवाहन केले. तसेच चालू हंगामात पूर्णा प्रकल्पाच्या येलदरी व सिद्धेश्वर धरणांतून एकूण तीन पाणीपाळ्या देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चौथी पाणीपाळी देण्यासाठी शासनाकडे पाठपुरावा करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

या कार्यक्रमास महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेचे व्यवस्थापक . सुहास वडकर, सहाय्यक व्यवस्थापक. पांडुरंग बोंकारे, कारखान्याचे सर्व संचालक, परिसरातील सभासद, शेतकरी बांधव, तोडणी व वाहतूक ठेकेदार, कार्यकारी संचालक अमोल पाटील तसेच कारखान्याचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कारखान्याच्या शेती व ऊसविकास उपसमितीचे अध्यक्ष . शहाजीराव देसाई यांनी केले. आगामी गळीत हंगाम यशस्वी करण्यासाठी शेतकरी, सभासद, कामगार आणि व्यवस्थापन एकत्रितपणे सहकार्य करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.