शेतात गवत कापताना वाघाचा हल्ला महिलांच्या धाडसामुळे वाघाला पिटाळले

Thu 22-Oct-2026,09:35 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर : शेतात कष्ट करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करणाऱ्या ६५ वर्षीय शेतकऱ्यावर गवत कापत असताना अचानक वाघाने हल्ला केल्याची धक्कादायक घटना नागभिड तालुक्यातील गिरगाव येथे घडली. कन्हाडगाव–गिरगाव नाल्यालगत असलेल्या शेतात सकाळी साडेअकराच्या सुमारास घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. सुदैवाने, शेतात धान कापणीचे काम करणाऱ्या महिलांनी प्रसंगावधान राखत घटनास्थळी धाव घेत वाघाला पिटाळून लावले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

देवाजी पांडुरंग वाढई ६५ वर्ष, रा. गिरगाव हे शुल्का अमरसिंग निकुरे यांच्या गट क्रमांक ३३८ मधील शेतात गवत कापण्याचे काम करीत होते. याच वेळी परिसरातून जाणाऱ्या वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या डोक्याला आणि हाताला वाघाच्या नखांमुळे किरकोळ जखमा झाल्या.

वाढई यांच्या मदतीसाठी त्यांनी केलेला आक्रोश ऐकताच जवळच धान कापणीचे काम करणाऱ्या महिला जेवण सोडून त्यांच्या दिशेने धावल्या. महिलांनी दाखवलेल्या धाडसामुळे वाघाला तेथून पळ काढावा लागला. या प्रसंगामुळे परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

घटनेची माहिती मिळताच गिरगाव येथील विनोद बोरकर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने वन विभागाला घटनेची माहिती दिली. त्यानंतर तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी, क्षेत्र सहाय्यक जी. एम. हिंगणकर, वनरक्षक पंडित मेकवाड आणि वनरक्षक माईन यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमी देवाजी वाढई यांना तातडीने सिंदेवाही येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले.

दरम्यान, हल्ला करणाऱ्या वाघाच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी वन विभागाने घटनास्थळी कॅमेरे लावले आहेत. परिसरात गस्तही वाढविण्यात आली आहे. या घटनेनंतर शेतात काम करणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

यावेळी स्वाब संस्थेचे बचाव दलप्रमुख जीवे सयाम, अध्यक्ष यश कायरकर व त्यांची टीम, पोलीस निरीक्षक राहुल गुहे तसेच गिरगावचे पोलीस पाटील बोरकर आणि इतर नागरिक उपस्थित होते.शेतीच्या कामासाठी दररोज जंगलालगतच्या शेतांमध्ये जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये या घटनेमुळे चिंतेचे वातावरण आहे.

पोटाची खळगी भरण्यासाठी शेतात राबणाऱ्या शेतकऱ्यांना वन्यप्राण्यांच्या हल्ल्याच्या भीतीत काम करावे लागत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी वन विभागाने आवश्यक खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे.तळोधीचे वनपरिक्षेत्र अधिकारी तेजस सूर्यवंशी यांनी जंगलालगतच्या शेतांमध्ये काम करताना नागरिकांनी विशेष सावधानता बाळगावी, असे आवाहन केले आहे.