स्थानिक गुन्हे शाखेची धडक कारवाई, ट्रॅक्टर चोरीचा उलगडा; ११.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

Tue 03-Feb-2026,06:03 AM IST -07:00
Beach Activities

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई

ट्रॅक्टर चोरीचा पर्दाफाश; ११.३० लाखांचा मुद्देमाल जप्त

वर्धा | प्रतिनिधी : युसूफ पठाण

वर्धा जिल्हा पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने (LCB) ट्रॅक्टर चोरीच्या गंभीर गुन्ह्याचा यशस्वीपणे उलगडा करत चोरीस गेलेला ट्रॅक्टर, ट्रॉली, चारचाकी वाहन व मोबाईल फोन असा एकूण ११ लाख ३० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

प्राप्त माहितीनुसार, फिर्यादी नारायण शंकरराव कोल्हे (रा. शिरपूर (हिरे), ता. देवळी, जि. वर्धा) यांनी तक्रार दाखल केली होती. त्यांचा ट्रॅक्टर वर्धा–यवतमाळ महामार्गालगत सर्व्हिस रोडच्या कडेला उभा असताना दि. २१ जानेवारी २०२६ रोजी रात्री ११.३० ते २२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० या कालावधीत अज्ञात व्यक्तीने चोरी केला होता. या प्रकरणी पोलीस ठाणे देवळी येथे गुन्हा क्रमांक ५०/२६, भा.दं.सं. कलम ३०३(२) BNS अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

सदर गुन्ह्याचा समांतर तपास स्थानिक गुन्हे शाखा, वर्धा करीत असताना सीसीटीव्ही फुटेज व गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांचे पथक चांदूर (रेल्वे), जि. अमरावती येथे पोहोचले. तपासादरम्यान चोरीस गेलेला ट्रॅक्टर हा मंगेश डोवळे, रा. चांदूर (रेल्वे) याने मारुती इको कार (MH-32-AS-2703) च्या सहाय्याने शिरपूर (ता. देवळी) येथून चोरी करून आणल्याची माहिती मिळाली.

तत्काळ कारवाई करत पोलिसांनी चांदूर (रेल्वे) येथे छापा टाकून आरोपींना ताब्यात घेतले. चौकशीत आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे —

मंगेश प्रभाकर डोवळे (वय ३०)

अभिजीत अनिल पेठे (वय ३०)

नकुल किसन कनासिया (वय १८)

(सर्व रा. भगवान चौक, माधव वॉर्ड, चांदूर (रेल्वे), जि. अमरावती)

आरोपींच्या निशाणीदाखल पंचांच्या उपस्थितीत खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला —

लाल रंगाचा महिंद्रा कंपनीचा (बिनानंबर) ट्रॅक्टर – ₹३,५०,०००/-

लाल रंगाची (बिनानंबर) ट्रॉली – ₹१,५०,०००/-

मारुती इको कार (MH-32-AS-2703) – ₹६,००,०००/-

तीन अँड्रॉइड मोबाईल फोन – ₹३०,०००/-

एकूण जप्त मुद्देमाल : ₹११,३०,०००/-

अटक आरोपी व जप्त मुद्देमाल पुढील कारवाईसाठी पोलीस ठाणे देवळी यांच्या ताब्यात देण्यात आला असून, प्रकरणाचा पुढील तपास देवळी पोलीस करीत आहेत.

ही उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक वर्धा मा. श्री सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक मा. श्री सदाशिव वाघमारे तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक मा. श्री विनोद चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिषसिंग ठाकूर, पोलीस उपनिरीक्षक प्रकाश नागापूरे, सफी मनोज धात्रक, पोहवा हमीद शेख, धर्मेंद्र अकाली, महादेव सानप, आशिष महेशगौरी, दिनेश बोथकर, विशाल मडावी, पोशि रितेश कुहाडकर यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा वर्धाच्या पथकाने सराहनीय कामगिरी बजावली.

वर्धा पोलिसांच्या या तत्पर कारवाईमुळे ट्रॅक्टर चोरीसारख्या गुन्ह्यांवर प्रभावी अंकुश बसेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.