वीरा वॉरियर्स बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

Mon 09-Mar-2026,10:49 PM IST -07:00
Beach Activities

वीरा वॉरियर्स बहुउद्देशीय संस्थेतर्फे जागतिक महिला दिन उत्साहात साजरा

अब्दुल कदीर बक्श हिंगणघाट 

हिंगणघाट : वीरा वॉरियर्स बहुउद्देशीय संस्था, हिंगणघाट यांच्या वतीने जागतिक महिला दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालय, हिंगणघाट येथे महिलांसाठी विविध उपक्रमांनी युक्त असा विशेष कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमात महिलांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून आला आणि परिसरात आनंदी व उत्साही वातावरण निर्माण झाले.

कार्यक्रमाची सुरुवात माता जिजाऊ यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून करण्यात आली. महिलांचा सन्मान आणि त्यांच्या कर्तृत्वाला वंदन करण्याच्या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यानंतर महिलांसाठी विविध मनोरंजक व क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले.

स्पर्धांमध्ये झुंबा, संगीत खुर्ची, लाठी बॅलन्स, रस्सीखेच, टच कॉईन, गेस द फिल्म, वस्तू ओळखा, उखाणे, गाणे व नृत्य यांसह एकूण १५ प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला होता. या सर्व स्पर्धांमध्ये महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत कार्यक्रमाला रंगत आणली. प्रत्येक खेळात सहभागी महिलांचा उत्साह आणि आत्मविश्वास पाहण्यासारखा होता.

कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या म्हणून डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यालयाच्या प्राचार्या खैरकर मॅडम उपस्थित होत्या. तसेच महाकाळकर मॅडम, राऊत मॅडम आणि आत्राम मॅडम या विशेष पाहुण्या म्हणून उपस्थित होत्या. उपस्थित मान्यवरांनी महिलांना प्रोत्साहन देत अशा कार्यक्रमांमुळे महिलांना स्वतःसाठी वेळ मिळतो आणि समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते, असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमादरम्यान घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये विजयी ठरलेल्या महिलांना ट्रॉफी व पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यामध्ये महामाया जीवने यांनी प्रथम क्रमांक, जयश्री टेकाम यांनी द्वितीय क्रमांक तर आशा नेमाडे यांनी तृतीय क्रमांक पटकावला. तसेच सक्रिय सहभाग नोंदवणाऱ्या सोनू निकुरे, जोष्णा बुरड, मेघा भुते आणि वासेकर यांचाही सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.

कार्यक्रमात सहभागी झालेल्या महिलांनी मनोगत व्यक्त करताना सांगितले की, हा त्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. घरकाम व दैनंदिन जबाबदाऱ्यांमध्ये नेहमी व्यस्त असताना आज स्वतःसाठी वेळ देता आला आणि खेळ, मनोरंजन व आनंदाचा अनुभव घेता आला. अशा कार्यक्रमांमुळे महिलांमध्ये आत्मविश्वास वाढतो तसेच एकमेकांशी संवाद साधण्याची संधी मिळते, असेही त्यांनी नमूद केले.

या कार्यक्रमाचे यशस्वी नियोजन रुचिका वानखेडे, अरोही पिसे, आस्था खैरे, आदिती गायकवाड, सुहानी नरवाडे, खुशी कुमरे, जान्हवी देवतळे आणि आर्या कुत्तरमारे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी सर्व स्वयंसेवक व सदस्यांनी परिश्रम घेतले.

या उपक्रमामुळे परिसरातील महिलांमध्ये आनंदाचे व उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून वीरा वॉरियर्स बहुउद्देशीय संस्थेच्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.