मिरापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
मिरापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी
वर्धा तालुका प्रतिनिधी : इरशाद शहा
मिरापूर गावात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांमुळे या उत्सवाला विशेष महत्त्व प्राप्त झाले.
उत्सवानिमित्त ग्रामस्वच्छता, वृक्षारोपण, बाल शिवव्याख्याने, पोवाडा गायन, सत्कार समारंभ तसेच बक्षीस वितरण सोहळा अशा समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. दीपप्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. त्यानंतर शिवव्याख्यान, समाजप्रबोधनपर कार्यक्रम आणि सप्तखंजेरी वादनाने उपस्थितांचे वातावरण भारावून गेले.
या कार्यक्रमाला शिवव्याख्याते प्रसाद जांभूळकर, जानवी ठाकरे, सोनू गेडाम, कुणाल हटीटेल तसेच राष्ट्रीय कीर्तनकार तुकारामजी घोडे महाराज आणि कृषी सहाय्यक कोठेकर साहेब यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे उत्कृष्ट सूत्रसंचालन ओम खडसे यांनी केले.
या प्रसंगी संघपाल महाराज यांनी तरुणांना मार्गदर्शन करताना सांगितले की, आजच्या तरुणांनी थोर महापुरुषांचे विचार आत्मसात करणे अत्यंत गरजेचे आहे. देशाला आज चांगल्या विचारांची गरज असून गावाचा विकास, तरुणांची भूमिका, स्वच्छता आणि समाजप्रबोधन यांमुळेच राष्ट्र अधिक बळकट होऊ शकते.
यावेळी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकाराम, महात्मा गांधी आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे महत्त्व सांगितले. तसेच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज, राष्ट्रसंत गाडगेबाबा, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि भगवान बिरसा मुंडा यांच्या कार्याचा उल्लेख करून त्यांच्या विचारांमधून समाजसेवा, स्वच्छता, समानता, परिश्रम आणि राष्ट्रप्रेमाचा संदेश मिळतो, असे सांगितले.
तरुणांनी हे विचार आपल्या जीवनात रुजविल्यास समाजात सकारात्मक बदल घडू शकतो आणि देशाच्या प्रगतीला नवी दिशा मिळू शकते, असेही त्यांनी नमूद केले. त्यांच्या प्रेरणादायी विचारांनी उपस्थितांना नवी ऊर्जा व दिशा मिळाली.
हा उत्सव केवळ सांस्कृतिक कार्यक्रमापुरता मर्यादित न राहता सामाजिक प्रबोधनाचा संगम ठरला. तसेच तरुणांना समाजकार्यात सक्रिय सहभाग घेण्याची प्रेरणा या कार्यक्रमातून मिळाली.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती व ग्रामस्थांनी अथक परिश्रम घेतले.