डायल 112 चा गैरवापर महागात; खोटी कॉल करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

Sun 15-Mar-2026,10:25 PM IST -07:00
Beach Activities

डायल 112 चा गैरवापर महागात; खोटी कॉल करणाऱ्या युवकावर गुन्हा दाखल

वर्धा : जिल्हा विशेष प्रतिनिधी युसुफ पठाण

आपत्कालीन प्रतिसाद प्रणाली डायल 112 चा गैरवापर करणे हा गंभीर गुन्हा असून वर्धा पोलिसांकडून या प्रणालीद्वारे जिल्ह्यातील नागरिकांना आपत्कालीन परिस्थितीत तात्काळ मदत मिळावी आणि कायदा-सुव्यवस्था राखली जावी यासाठी विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.

दि. 13 मार्च 2026 रोजी डायल 112 कंट्रोल रूममध्ये एक कॉल प्राप्त झाला. कॉल करणाऱ्या व्यक्तीने देवळी–रत्नपूर मार्गावर त्याच्या वाहनाला धडक दिल्याची माहिती दिली. तसेच संबंधित वाहनातील तिघांच्या हातात बंदूक असून त्यांनी त्याच्यावर गोळीबार केल्याचा दावा केला. ही गोळी जवळील झाडाला लागल्याचेही त्याने सांगितले. तसेच आरोपी यवतमाळच्या दिशेने पळून गेल्याचेही कॉलमध्ये नमूद करण्यात आले.

ही माहिती मिळताच अवघ्या 15 सेकंदांत कंट्रोल रूममधून देवळी पोलीस ठाण्याला संदेश पाठविण्यात आला. देवळीचे पोलीस निरीक्षक तसेच पुलगावचे उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही तात्काळ कळविण्यात आले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस त्वरित घटनास्थळी पोहोचले. मात्र तपासादरम्यान अशा प्रकारची कोणतीही घटना घडलेली नसल्याचे स्पष्ट झाले.

यानंतर पोलिसांनी कॉल करणारा महेश सतीश जुमाळे याच्याशी संपर्क साधला असता तो गोलमोल उत्तरे देऊ लागला आणि घटनास्थळी येण्यासही नकार दिला. पुढील शोधमोहीमेत तो कंगाव येथे आढळून आला. त्या वेळी तो मद्यधुंद अवस्थेत होता. चौकशीदरम्यान त्याने कॉल आपणच केल्याची कबुली दिली.

तपासानंतर आरोपीने खोटी माहिती देऊन पोलीस प्रशासनाची दिशाभूल केली व सरकारी आपत्कालीन सेवेचा गैरवापर केल्याचे स्पष्ट झाले. या प्रकरणी देवळी पोलीस ठाण्यात अपराध क्रमांक 148/2026 अंतर्गत भारतीय दंड संहितेच्या कलम 217 व 85 अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, डायल 112 या आपत्कालीन सेवेचा वापर केवळ खरी आपत्कालीन परिस्थिती असतानाच करावा. खोटी कॉल किंवा चुकीची माहिती देणाऱ्यांविरुद्ध कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अप्पर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे तसेच पुलगाव उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. वंदना करखेले यांच्या मार्गदर्शनाखाली देवळीचे पोलीस निरीक्षक अमोल मदालकर व त्यांच्या पथकाने केली.