विसापूर फाट्यावर जुन्या वादातून तरुणावर हल्ला : ७ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Wed 22-Apr-2026,09:56 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : जुन्या वादातून विसापूर फाट्यावर एका तरुणावर काठी, दगड व हाताबुक्क्यांनी मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी सात जणांविरुद्ध गुन्हा नोंदविला असून पुढील तपास सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, फिर्यादी अंशूल दिवाकर रणदिवे (२१), रा. विसापूर हा १९ एप्रिल रोजी दुपारी साडेतीन वाजताच्या सुमारास मोटारसायकलने मातोश्री वृद्धाश्रमकडे जात असताना विसापूर फाट्याजवळ त्याला आरोपींनी अडवले. जुन्या वादातून तू आमच्याकडे का पाहिले या कारणावरून आरोपी गणेश पधेरे, साहील कुळमेथे व रोशन टेकाम यांनी त्याच्यावर हल्ला चढविला.

यावेळी आरोपी साहील कुळमेथे याने हाताबुक्क्यांनी व दगडाने डोक्यावर व कानाजवळ मारहाण केली, तर आरोपी गणेश पधेरे याने काठी फेकून मारल्याने फिर्यादीच्या पाठीवर दुखापत झाली. आरोपी रोशन टेकाम यानेही मारहाण केली. त्यानंतर आरोपी यश आलाम, दिनेश पधेरे व इतर दोन अनोळखी इसमांनीही मिळून फिर्यादीला मारहाण केली.

दरम्यान, भांडण सोडविण्यासाठी आलेल्या पानटपरी चालक गोविल खूणे यालाही आरोपींनी मारहाण करत दुकानातील सामानाची तोडफोड केली. तसेच फिर्यादीच्या मोटारसायकलीचेही नुकसान करण्यात आले. या घटनेत एकूण अंदाजे ९ ते १० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचे सांगितले जाते.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपींविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ११५(२), ११८(१), १२५(अ), १८९(२) अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक संतोष येनगंधेवार करीत आहेत.