चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अल्लीपूर पोलिसांचा पुढाकार; ‘ऑपरेशन दक्ष’ व्हॉट्सॲप ग्रुप सुरू
चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी अल्लीपूर पोलिसांचा पुढाकार; ‘ऑपरेशन दक्ष’ व्हॉट्सॲप ग्रुप सुरू
अल्लीपूर | तालुका प्रतिनिधी : सुनील हिंगे
हिंगणघाट तालुक्यातील अल्लीपूर पोलीस ठाण्याच्या वतीने चोरीच्या गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी ‘ऑपरेशन दक्ष’ या नावाने विशेष व्हॉट्सॲप ग्रुप सुरू करण्यात आला आहे. नागरिकांच्या सहकार्याने घरफोडी व चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळविण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.
पोलीस अधीक्षक श्री. सौरभकुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम सुरू करण्यात आला असून, नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी पोलिसांनी हे अभिनव पाऊल उचलले आहे.
या उपक्रमांतर्गत गावातील नागरिक जेव्हा आपल्या कुटुंबासह काही दिवसांसाठी बाहेरगावी जाणार असतील, तेव्हा त्यांनी ‘ऑपरेशन दक्ष’ व्हॉट्सॲप ग्रुपवर आपल्या घराची माहिती व लोकेशन पाठवायची आहे. संबंधित माहिती प्राप्त झाल्यानंतर रात्रीच्या गस्तीदरम्यान पोलीस अधिकारी व कर्मचारी त्या परिसरात विशेष लक्ष ठेवतील तसेच संबंधित घरासमोर नियमित भेट देतील.
यामुळे रिकाम्या घरांवर लक्ष ठेवणे शक्य होणार असून चोरी व घरफोडीच्या घटनांना मोठ्या प्रमाणात आळा बसण्यास मदत होणार आहे. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून स्वागत करण्यात येत आहे.
अल्लीपूर पोलिसांनी परिसरातील सर्व नागरिकांना आवाहन केले आहे की, काही दिवसांसाठी बाहेरगावी जात असताना ‘ऑपरेशन दक्ष’ व्हॉट्सॲप ग्रुपवर आवश्यक माहिती द्यावी, जेणेकरून पोलीस यंत्रणेला योग्य ती खबरदारी घेता येईल आणि नागरिकांच्या मालमत्तेचे संरक्षण करता येईल.
नागरिकांच्या सहभागातून सुरक्षित गाव घडविण्याच्या दिशेने अल्लीपूर पोलिसांचा ‘ऑपरेशन दक्ष’ हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरत असून चोरीच्या गुन्ह्यांवर नियंत्रण मिळविण्यासाठी तो प्रभावी ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.