तिरंगा बाईक रॅलीत आ. किशोर जोरगेवार स्वतः बाईक चालवत सहभागी
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : स्वातंत्र्यदिनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आमदार किशोर जोरगेवार यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेली भव्य तिरंगा बाईक रॅली शनिवारी उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली. या रॅलीत आमदार किशोर जोरगेवार यांनी स्वतः बाईक चालवत सहभाग घेत रॅलीचे नेतृत्व केले. त्यांच्या सहभागामुळे भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच नागरिकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सकाळी १० वाजता रॅलीला सुरुवात झाली.
भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि देशप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने दुचाकींवर तिरंगा ध्वज घेऊन रॅलीत सहभागी झाले होते. भारत माता की जय, वंदे मातरम् अशा देशभक्तीपर घोषणांनी चंद्रपूर शहरातील प्रमुख मार्ग दुमदुमून गेले.
यावेळी आमदार किशोर जोरगेवार यांनी उपस्थितांना संबोधित करताना तिरंगा हा केवळ राष्ट्रध्वज नसून देशाच्या स्वाभिमान, त्याग आणि एकतेचे प्रतीक असल्याचे सांगितले.
स्वातंत्र्यसैनिकांनी दिलेल्या बलिदानामुळे देशाला स्वातंत्र्य मिळाले असून राष्ट्रहिताला सर्वोच्च प्राधान्य देणे हीच त्यांच्याप्रती खरी आदरांजली असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रत्येक नागरिकाने देशाच्या प्रगतीसाठी योगदान देत राष्ट्र प्रथम या भावनेने कार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले.
युवकांनी देशाच्या विकासात सक्रिय सहभाग घ्यावा तसेच राष्ट्रीय एकात्मता, बंधुभाव आणि सामाजिक सलोखा कायम ठेवण्यासाठी पुढाकार घ्यावा, असेही त्यांनी सांगितले. तिरंगा प्रत्येक भारतीयाच्या मनात अभिमान आणि देशसेवेची प्रेरणा निर्माण करणारा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रॅलीदरम्यान सामूहिक वंदे मातरम् गायन करण्यात आले. राष्ट्रध्वजाचा सन्मान, देशभक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश देत स्वातंत्र्यदिनाचा उत्साह साजरा करण्यात आला.
छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून सुरू झालेली रॅली गांधी चौक, जटपुरा गेट, प्रियदर्शिनी चौक, वरोरा नाका, जनता कॉलेज, वाहतूक कार्यालय, एसटी वर्कशॉप चौक, रामनगर पोलीस स्टेशन चौक आणि बंगाली कॅम्प चौक मार्गे गिरणार चौक येथे पोहोचली. भारतीय जनता पार्टी, चंद्रपूर महानगरच्या वतीने आयोजित या तिरंगा बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा चंद्रपूरकरांच्या राष्ट्रभक्तीची प्रचिती देणारा ठरला.