नगरपरिषदेचा भूखंड विक्रीचा आरोप; कारवाईसाठी बेमुदत आंदोलन

Tue 08-Sep-2026,04:02 AM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत नगरपरिषदेच्या मालकीच्या भूखंडांची कथित बेकायदेशीर नोंद करून त्यांची खरेदी-विक्री केल्याच्या आरोपावरून वसमत शहरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणातील कथित भू-माफिया तसेच सहभागी अधिकारी व कर्मचाऱ्यांवर गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी अखिल भारतीय भ्रष्टाचार निर्मूलन संघर्ष समितीच्या वतीने उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर बेमुदत लक्षवेधी आंदोलनाला सुरुवात करण्यात आली आहे.

सर्व्हे क्रमांक १८० मधील नगरपरिषदेच्या मालकीच्या दोन भूखंडांची कथितरित्या खासगी व्यक्तींच्या नावावर नोंद करण्यात आली आणि त्यानंतर लाखो रुपयांना त्यांची खरेदी-विक्री झाल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या संपूर्ण व्यवहाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

आंदोलनकर्त्यांनी खरेदी-विक्री व्यवहार रद्द करून भूखंड सीज करावेत, संबंधित भू-माफियांवर संघटित गुन्हेगारीच्या अनुषंगाने कारवाई करावी, नगरपरिषदेतील संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांना सहआरोपी करून निलंबित करावे तसेच दुय्यम निबंधक अधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांचीही चौकशी करावी, अशा मागण्या केल्या आहेत.

याशिवाय सर्व्हे क्रमांक १८० व त्याच्या पोटहिस्स्यांतील मागील व्यवहार, फेरफार, नामांतर व महसुली नोंदींची एसआयटीमार्फत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.

प्रशासनाने तातडीने दखल न घेतल्यास आंदोलनाची तीव्रता वाढवून हलगी बजावणे, थाळीनाद, ढोल-ताशे, बोंबाबोंब, भजन-कीर्तन व तिरडी आंदोलन अशा विविध आंदोलनात्मक मार्गांचा अवलंब करण्याचा इशारा देण्यात आला आहे.

“नगरपरिषदेच्या मालमत्तेच्या कथित गैरव्यवहाराची निष्पक्ष चौकशी होईपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही,” अशी ठाम भूमिका संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष आनंद खरे व पत्रकार मुनीरोद्दीन फारुखी यांनी व्यक्त केली.