सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १२ तासांत घरफोडीचा छडा
सेलू पोलिसांची धडाकेबाज कारवाई; १२ तासांत घरफोडीचा छडा
प्रतिनिधि,इरशाद शाह वर्धा
वर्धा : केळझर येथे दिवसा घराचे कुलूप तोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम चोरी करणाऱ्या दोन आरोपींना सेलू पोलिसांच्या गुन्हे अन्वेषण पथकाने अवघ्या १२ तासांत अटक केली. आरोपींकडून चोरीस गेलेल्या मुद्देमालासह एकूण १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
केळझर येथील छाया विलास तडस यांच्या घरी १ ऑक्टोबर रोजी दिवसा चोरी झाली होती. अज्ञात चोरट्याने घरातील लोखंडी कपाटाचे कुलूप तोडून त्यामधील सोन्याची पोत, सोन्याचे मणी, पदक आणि २ हजार रुपये रोख असा मुद्देमाल चोरून नेला. याप्रकरणी २ ऑक्टोबर रोजी सेलू पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
गुन्ह्याचा तपास करताना पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने रोशन संजयराव बोरेकर (२६) आणि अभिनव किसनाजी देव्हारे, दोघेही रा. वॉर्ड क्रमांक ४, केळझर, यांना ताब्यात घेऊन अटक केली.
आरोपींकडून गुन्ह्यात वापरलेली हिरो स्प्लेंडर मोटारसायकल, दोन मोबाईल फोन, २ हजार रुपये रोख, ५६ सोन्याचे मणी वजन १.९६० ग्रॅम आणि सोन्याचे पदक वजन ३.०९० ग्रॅम, असा एकूण १ लाख ८५ हजार ५५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. चोरीस गेलेला १०० टक्के मुद्देमाल हस्तगत करून पोलिसांनी अवघ्या १२ तासांत गुन्ह्याचा छडा लावला.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद मकेश्वर यांच्या मार्गदर्शनाखाली सेलू पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक पंकज वाघोडे, पोलिस उपनिरीक्षक विशाल नल्लावार तसेच पोलिस अंमलदार अनिल केकतपुरे, रामकिसन इप्पर, गजानन कमठाने, विनायक गोडे, ओमप्रकाश तल्लारी आणि लोकेश पवनकर यांनी केली.