देवळी पोलिसांची कारवाई; २४ तासांत मंगळसूत्र चोरीचा छडा
देवळी पोलिसांची कारवाई; २४ तासांत मंगळसूत्र चोरीचा छडा
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
देवळी : सिरसगाव (धनाडे) येथे घरातून चोरीला गेलेले ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र देवळी पोलिसांनी २४ तासांत हस्तगत करून चोरीचा गुन्हा उघडकीस आणला.
सिरसगाव (धनाडे) येथील हर्षल प्रभाकरराव राऊत (३७) यांनी देवळी पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्यांच्या आई सुरेखा राऊत यांचे मंगळसूत्र घरातील संगणक टेबलच्या ड्रॉवरमध्ये ठेवले होते. अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश करून ड्रॉवरमधील सुमारे ३५ हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र चोरून नेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले होते.
गुन्हा दाखल झाल्यानंतर देवळी पोलिसांनी अज्ञात आरोपीचा शोध सुरू केला. तपासादरम्यान तक्रारदाराच्या घरी नेहमी ये-जा करणाऱ्या एका महिलेबाबत पोलिसांना माहिती मिळाली. तिची विश्वासात घेऊन चौकशी केली असता तिने मंगळसूत्र चोरी केल्याची कबुली दिली. तिच्याकडून चोरीस गेलेले मंगळसूत्र पोलिसांनी जप्त केले.
ही कारवाई पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे आणि उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. वंदना कारखेलेंच्या मार्गदर्शनाखाली देवळी पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप कापडे, पोलिस हवालदार अमोल आलवाडकर, श्याम गावनेर, पोलिस शिपाई संतोष गिते आणि आकाश कसर यांनी केली. गुन्ह्याचा पुढील तपास पोलिस हवालदार अमोल आलवाडकर करीत आहेत.