खर्रा नाही आहे म्हटल्याचा संताप २१ वर्षीय तरुणाला जबर मारहाण

Sun 04-Oct-2026,11:25 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

बल्लारपूर : मोबाईल रिचार्ज करण्यासाठी घराबाहेर पडलेल्या २१ वर्षीय भूषणवर केवळ खर्रा दिला नाही म्हणून संतापलेल्या दोघांनी हल्ला केल्याची धक्कादायक घटना बल्लारपूरच्या मिलिंद चौक परिसरात घडली. खर्रा नसल्याचे सांगताच शिवीगाळ सुरू झाली आणि काही क्षणांतच वादाचे रूपांतर मारहाणीत झाले. दोघांनी भूषणला हाताबुक्यांनी मारहाण केली, तर एकाने हातातील कड्याने त्याच्या डोक्यावर प्रहार केला.

डोक्याला मार लागताच चक्कर आल्याने भूषण जागेवरच जमिनीवर कोसळला. भूषण शंकर निमसटर (२१), रा. मौलाना आझाद वार्ड, बल्लारपूर, असे जखमी तरुणाचे नाव आहे. २ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजताच्या सुमारास भूषण हा घराजवळील मिलिंद चौकातील मोबाईल शॉपमध्ये मोबाईल रिचार्ज करण्यासाठी गेला होता.

त्यावेळी दुकानात आरोपी मैनाक आणि पज्जी हे दोघेही उपस्थित होते.

दरम्यान, आरोपी पज्जीने भूषणकडे खर्रा मागितला. मात्र, आपल्याकडे खर्रा नसल्याचे भूषणने सांगितले. यामुळे संतापलेल्या पज्जीने त्याला शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. विनाकारण शिवीगाळ का करीत आहे, अशी विचारणा भूषणने केली असता पज्जीने त्याच्या गालावर थापड मारली. यानंतर परिस्थिती अधिकच बिघडली. दोन्ही आरोपीने भूषणला हाताबुक्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली.

मारहाणीदरम्यान मैनाक याने हातातील कड्याने भूषणच्या डोक्यावर जोरदार प्रहार केला. डोक्याला मार लागल्याने भूषणला अचानक चक्कर आली आणि तो जमिनीवर कोसळला. काही वेळाने शुद्धीवर आल्यानंतर घडलेल्या प्रकाराने हादरलेल्या भूषणने थेट बल्लारपूर पोलीस ठाणे गाठून आपली तोंडी तक्रार नोंदवली.

या प्रकरणी बल्लारपूर पोलिसांनी आरोपीं मैनाक आणि पज्जी विरुद्ध कलम ११८(१), ३५२ बीएनएस अंतर्गत गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक बिपिन इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार संदेश वाघमारे करीत आहेत.