AIMIM च्या आंदोलनाला यश; चौकशीचे आदेश जारी!
AIMIM च्या आंदोलनाला यश; चौकशीचे आदेश जारी!
आसिफ खान यांच्या आंदोलनाची प्रशासनाकडून दखल; समुद्रपूरच्या उपविभागीय अभियंत्यांकडे चौकशीची जबाबदारी
नावेद पठाण मुख्य संपादक, वर्धा
वर्धा : सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता रोहित चंदेले यांच्या कथित अरेरावीच्या वर्तनाविरोधात AIMIM चे वर्धा जिल्हाध्यक्ष आसिफ खान यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषण आंदोलनाला महत्त्वपूर्ण यश मिळाले आहे. प्रशासनाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश जारी केल्यानंतर खान यांनी आपले उपोषण मागे घेतले.
आसिफ खान यांनी संबंधित प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करून योग्य कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली होती. या निवेदनाची दखल घेत सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी ३० ऑक्टोबर २०२६ रोजी अधिकृत कार्यालयीन आदेश जारी केला.
या आदेशानुसार, वर्धा येथील उपविभाग क्रमांक १ मधील अधिकाऱ्याऐवजी समुद्रपूर येथील उपविभागीय अभियंत्यांची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तक्रारीतील सर्व बाबींची तपासणी करून चौकशी अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
नागरिकांच्या सन्मानासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर आवाज उठविण्यासाठी हे आंदोलन सुरू करण्यात आल्याचे आसिफ खान यांनी सांगितले. प्रशासनाकडून चौकशीचे आदेश मिळाल्यानंतर त्यांनी आमरण उपोषण मागे घेतले.
दरम्यान, या प्रकरणाच्या चौकशीकडे नागरिकांचे लक्ष लागले असून, चौकशी अहवालानंतर प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.