एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा बळी,सिंदेवाही तालुक्यात मानव-वन्यजीव संघर्ष तीव्र

Fri 30-Oct-2026,11:39 PM IST -07:00
Beach Activities

शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर

चंद्रपूर: चंद्रपूर जिल्ह्यात मानव-वन्यजीव संघर्ष दिवसेंदिवस गंभीर होत असून, वाघाच्या हल्ल्यांच्या घटनांनी नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. चिमूर आणि सिंदेवाही तालुक्यात एकाच दिवशी वाघाच्या हल्ल्यात दोन शेतकऱ्यांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. चिमूर तालुक्यातील उरकुडपार येथे सदाशिव खडसंग ५५ वर्ष यांचा, तर सिंदेवाही तालुक्यातील धुमनखेडा येथे पत्रूजी रामा मेश्राम यांचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला.

धुमनखेडा परिसरात घडलेल्या घटनेमुळे गावात शोककळा पसरली असून, शेतकरी आणि शेतमजुरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. शेतातील कामांसाठी घराबाहेर पडणेही आता धोकादायक ठरत असल्याने ग्रामीण भागातील नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

विशेष म्हणजे, सिंदेवाही तालुक्यात आठवडाभरातील वाघाच्या हल्ल्याची ही तिसरी घटना असल्याची माहिती समोर येत आहे. एकाच दिवशी दोन जणांचा बळी गेल्याने वनविभागाच्या कार्यपद्धतीवरही प्रश्न उपस्थित केले जात आहेत. वाघांच्या वाढत्या हालचालींमुळे शेतकरी, शेतमजूर आणि गुराख्यांचे जगणे कठीण झाले आहे.

वारंवार घडणाऱ्या या घटनांना आळा घालण्यासाठी वनविभागाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, वाघांचा बंदोबस्त करावा आणि नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी प्रभावी गस्त व संरक्षण व्यवस्था निर्माण करावी, अशी मागणी परिसरातील नागरिकांकडून होत आहे.