ताडोबा बफरमध्ये अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू,वाघांतील झुंजीत मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर विभागातील शिवनी वनपरिक्षेत्रात एका अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू झाल्याची घटना ६ फेब्रुवारी २०२६ उघडकीस आली. कक्ष क्रमांक ८४२, नियतक्षेत्र शिवनी येथे सदर बछड्याचा मृतदेह आढळून आला.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक वनपरिक्षेत्र अधिकारी अरविंद पेंदम व त्यांचे सहकारी, बफर विभागाचे सहाय्यक वनसंरक्षक एस. एस. डुबे, राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरण (एनटीसीए)चे प्रतिनिधी बंडू धोतरे, प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांचे प्रतिनिधी मुकेश भांदककर यांनी घटनास्थळी भेट दिली. यावेळी पशुसंवर्धन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. विलास गावखरे (मुल), पशुधन विकास अधिकारी डॉ. बजरंग सवारे (सिंदेवाही) तसेच टीटीसीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. कुंदन पोडचेलवार उपस्थित होते.
प्राथमिक तपासात सदर अवयस्क वाघाच्या बछड्याचा मृत्यू दोन वाघांमधील झुंजीत झाल्याचे निदर्शनास आले आहे. घटनास्थळाच्या पाहणीत वाघाच्या मानेवर गंभीर जखमा आढळून आल्या असून मागील भाग खाल्ल्याचेही स्पष्ट झाले आहे. या कारणांमुळे मृत वाघ नर होता की मादी, याची निश्चिती होऊ शकली नाही.
त्यानंतर तज्ज्ञ पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत वाघाचे शवविच्छेदन करण्यात आले. एनटीसीएच्या मानक कार्यपद्धतीनुसार (एसओपी) शवविच्छेदनानंतर मृतदेहाचे दहन करण्यात आले असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आली आहे.