हिंगणघाट येथे कॅलिग्राफी क्लासेसचा यशस्वी समारोप
हिंगणघाट येथे कॅलिग्राफी क्लासेसचा यशस्वी समारोप
प्रतिनिधि आसिफ मलनस
हिंगणघाट : श्री भाऊरावजी गोल्हर बहुउद्देशीय संस्था, हिंगणघाट यांच्या वतीने आयोजित ‘बेसिक एज्युकेशन’ अंतर्गत निशुल्क कॅलिग्राफी क्लासेस या उपक्रमाचा शुभारंभ व यशस्वी समारोप उत्साहात पार पडला.
या उपक्रमाची सुरुवात दि. ११ फेब्रुवारी २०२६ रोजी पारंपरिक पद्धतीने करण्यात आली. प्रारंभी दीपप्रज्वलन व सरस्वती पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. यावेळी श्री किशोरजी भांदककर सर यांनी विद्यार्थ्यांना उत्तम हस्ताक्षराचे महत्त्व पटवून देत नियमित सराव, शिस्त आणि लेखन कौशल्य वाढविण्याबाबत मार्गदर्शन केले.
या कॅलिग्राफी क्लासेसमध्ये बेसिक हँडरायटिंग (इंग्रजी, मराठी व हिंदी), कर्सिव्ह हँडरायटिंग, रोमन कॅलिग्राफी तसेच 3D रायटिंग या विविध विषयांचे प्रशिक्षण देण्यात आले.
प्रशिक्षणासाठी अनुभवी मार्गदर्शक म्हणून श्री किशोरजी भांदककर (आर्ट डायरेक्टर) यांनी विद्यार्थ्यांना उत्कृष्ट मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षरामध्ये लक्षणीय सुधारणा झाल्याचे पालकांनी समाधान व्यक्त केले.
दि. २० मार्च २०२६ रोजी क्लासेसचा समारोप सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावेळी संस्थेचे प्रमुख मान्यवर श्री भाऊरावजी गोल्हर, सौ. बेबी भा. गोल्हर, समाजसेविका सौ. स्वाती वांदिले उपस्थित होत्या. विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र व टी-शर्टचे वितरण करण्यात आले. तसेच त्यांच्या प्रगतीचे कौतुक करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या.
कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी संस्थेच्या संचालिका तसेच सचिव सौ. कांचन गोल्हर, शिक्षकवर्गातील सौ. संकल्पा मानमोडे, रवी गोल्हर, महावीर वरहारे, नचिकेत बोटकुळे, विशाल मुटे, सागर कोठेकर, जीवन तडस, किशोर गिरडे, प्रशांत बांगडे यांनी विशेष परिश्रम घेतले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या लेखन कौशल्यात मोठी भर पडली असून पालक व नागरिकांकडून संस्थेच्या कार्याचे कौतुक होत आहे.