दुर्मिळ सापांना जीवदान; जीवरक्षक फाऊंडेशनची तत्पर कारवाई

Sun 12-Apr-2026,07:37 AM IST -07:00
Beach Activities

दुर्मिळ सापांना जीवदान; जीवरक्षक फाऊंडेशनची तत्पर कारवाई

( नावेद पठाण मुख्य संपादक सावंगी मेघे )

हिंगणघाट : मूक प्राण्यांच्या रक्षणासाठी सदैव तत्पर असलेल्या जीवरक्षक फाऊंडेशनने दोन दुर्मिळ निमविषारी सापांना सुरक्षितपणे पकडून वनपरिसरात सोडत त्यांना जीवदान दिले.

दि. ११ एप्रिल २०२६ रोजी हिंगणघाट शहरालगत असलेल्या शिरुड गावात एका घरातील कुंडीत दुर्मिळ प्रजातीचा हरणटोळ साप आढळून आल्याची माहिती सर्पमित्र सागर शेंडे, ओम कापसे व साहिल माहुरे यांना मिळाली. त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत साप सुरक्षितपणे पकडला. हरणटोळ हा साप प्रामुख्याने जंगलात आढळतो. तो पूर्णपणे झाडांवर राहणारा असून वेलींवर किंवा फांद्यांवर दिसून येतो. घनदाट व उष्ण जंगल परिसरात त्याचे वास्तव्य असते, अशी माहिती सर्पमित्र सागर शेंडे यांनी दिली.

दरम्यान, हिंगणघाट रेल्वे स्थानक परिसरात मध्यरात्री झाडावर साप असल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्यांनी जीवरक्षक राकेश झाडे यांना दिली. त्यानंतर सर्पमित्र गोलू मडावी, भाविक कोपरकर व चेतन गावंडे यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता तेथे दुर्मिळ ‘मांजऱ्या साप’ आढळून आला. हा साप निमविषारी असून प्रामुख्याने झाडांवर राहणारा व निशाचर स्वभावाचा आहे, असे सर्पमित्र भाविक कोपरकर यांनी सांगितले.

सदर दोन्ही सापांना वनकर्मचारी वैरागडे व पाटील यांच्या उपस्थितीत सुरक्षितपणे नैसर्गिक अधिवासात सोडण्यात आले.