वसमत शहरात हेल्मेट जनजागृतीसाठी भव्य बाईक रॅली; सुरक्षित वाहतुकीसाठी पोलिसांचे आवाहन

Wed 29-Apr-2026,09:11 PM IST -07:00
Beach Activities

प्रतिनिधी : अशोक इंगोले हिंगोली 

हिंगोली : वसमत शहरातील रस्ते अपघातांचे प्रमाण कमी करून नागरिकांमध्ये सुरक्षित वाहतुकीबाबत जागरूकता निर्माण करण्याच्या उद्देशाने वसमत शहर पोलीस स्टेशनच्या वतीने हेल्मेट जनजागृती बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले. हिंगोली जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या आदेशानुसार तसेच डीवायएसपी यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम राबविण्यात आला.

या रॅलीचे नेतृत्व वसमत शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार पो. वाघ यांनी केले. शहरातील प्रमुख मार्गांवरून काढण्यात आलेल्या या रॅलीतून “अपघात टाळण्यासाठी हेल्मेटचा वापर करा” असा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात आला.

रॅलीदरम्यान पोलिसांनी वाहनचालकांना हेल्मेटचे महत्त्व पटवून देत वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले. हेल्मेट न वापरल्यास होणारे गंभीर अपघात आणि त्याचे परिणाम याबाबतही सविस्तर जनजागृती करण्यात आली.

या उपक्रमात पोलीस अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. तसेच शहरातील नागरिकांनीही उत्स्फूर्त प्रतिसाद देत पोलिसांच्या या जनजागृती मोहिमेचे स्वागत केले.