अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपी अटकेत
अल्पवयीन मुलीचे अपहरण; आरोपी अटकेत
प्रतिनिधि इरशाद शाह वर्धा
वर्धा : अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिला पळवून नेणाऱ्या आरोपीला अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा पथकाने यवतमाळ जिल्ह्यातून ताब्यात घेतले. आरोपीच्या ताब्यातून अल्पवयीन मुलीची सुखरूप सुटका करण्यात आली.
वडनेर पोलीस ठाण्यात एका ४५ वर्षीय व्यक्तीने दिलेल्या तक्रारीनुसार, ते आपल्या कुटुंबासह हिंगणघाट तालुक्यातील पेरणगाव येथे शेतमालकाच्या शेतात कापूस वेचणीचे काम करण्यासाठी आले होते. १० डिसेंबर २०२५ रोजी फिर्यादी उपचारासाठी सेवाग्राम येथे गेले होते. त्यावेळी त्यांची पत्नी अल्पवयीन मुलीसह शेतात काम करीत होती. दुपारी मुलगी जेवण करण्यासाठी शेतातील झाडाजवळ गेली; मात्र बराच वेळ होऊनही ती परतली नाही. शोध घेतला असता मुलगी तसेच शेतात काम करणारा वाल्मीक मोरेश्वर ढोबळे हे दोघेही आढळून आले नाहीत.
कुटुंबीयांनी गाव परिसरात तसेच आजूबाजूच्या भागात शोध घेतला. मात्र मुलगी मिळून न आल्याने तिला पळवून नेल्याचा संशय व्यक्त करत वडनेर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. त्यानुसार गुन्हा नोंदवून तपास अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाकडे सोपविण्यात आला.
पथकाने तपासाची सूत्रे हाती घेतल्यानंतर अल्पवयीन मुलगी आणि संशयित आरोपी वाल्मीक मोरेश्वर ढोबळे (वय २९, रा. कारेगाव, ता. जि. यवतमाळ) यांचा गुप्त माहितीच्या आधारे शोध सुरू केला. आरोपी किन्ही, ता. जि. यवतमाळ येथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती देण्यात आली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांनी पथक तयार करून किन्ही येथे शोध घेतला. यावेळी आरोपी व अल्पवयीन मुलगी एकाच ठिकाणी आढळून आले.
आरोपीची चौकशी केली असता, शेतात काम करत असताना अल्पवयीन मुलीशी त्याची ओळख झाली होती. तिला सोबत पळून जाऊन लग्न करण्याचे सांगून १० डिसेंबर रोजी दुपारी शेतातून पळवून नेल्याचे त्याने सांगितले. त्यानंतर दोघे एसटी बसने राळेगाव, यवतमाळ, शेगाव, शिर्डी, अक्कलकोट व पुणे येथे गेले. पैसे संपल्यानंतर ते यवतमाळ जिल्ह्यात परत आले. मागील काही काळापासून आरोपी किन्ही येथे ग्रामपंचायत कार्यालयाच्या कचरा गाडीवर कचरा जमा करण्याचे काम करीत असल्याची माहिती चौकशीत समोर आली.
आरोपी व अल्पवयीन मुलीला ताब्यात घेऊन पुढील तपासासाठी वडनेर पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल, अपर पोलीस अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या नेतृत्वात पोलीस अंमलदार अमर लाखे, संजयसिंग सूर्यवंशी, सहकात युरंगे, संजय राठोड, नितेश मेश्राम, शबाना शेख, नवनाथ मुंडे तसेच अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष, वर्धा पथकाने केली.