चंद्रपूरमध्ये आरपीएफ आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या संयुक्त कारवाईत दोन बालिकांना सुरक्षित निवारा
शहर प्रतिनिधी नरेंद्र कांबळे बल्लारपूर
चंद्रपूर : बिहार राज्यातून घर सोडून बेंगळुरू येथे जात असलेल्या दोन बालिकांना चंद्रपूर रेल्वे सुरक्षा दल (आरपीएफ) आणि चाईल्ड हेल्पलाईनच्या संयुक्त कार्यवाहीत सुरक्षिततेच्या दृष्टीने ताब्यात घेण्यात आले. बाल कल्याण समितीच्या मौखिक आदेशानुसार दोन्ही बालिकांना पुढील काळजी व संरक्षणासाठी चंद्रपूर येथील सखी वन स्टॉप सेंटरमध्ये ठेवण्यात आले आहे.
२८ सप्टेंबर २०२६ रोजी आरपीएफ ठाणे चंद्रपूरकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे चाईल्ड हेल्पलाईनचे कर्मचारी आरपीएफ ठाण्यात दाखल झाले. यावेळी प्राथमिक चौकशीत दोन्ही बालिका बिहार राज्यातून घर सोडून बेंगळुरू येथे जात असल्याची माहिती समोर आली.
त्यानंतर त्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात आली.
दोन्ही बालिकांची वैद्यकीय तपासणी केल्यानंतर त्यांना सुरक्षित निवारा उपलब्ध करून देण्यात आला. सध्या त्यांची काळजी व संरक्षणाची जबाबदारी संबंधित यंत्रणांकडून घेतली जात आहे. जिल्हा बाल संरक्षण कक्षामार्फत त्यांच्या आई-वडिलांचा शोध घेण्यात येणार असून, आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर दोन्ही बालिकांना त्यांच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येणार आहे.
या संयुक्त कार्यवाहीत चाईल्ड हेल्पलाईनच्या समुपदेशिका दीपाली मसराम आणि केस वर्कर अंकुश उराडे यांच्यासह आरपीएफ ठाणे चंद्रपूर येथील एएसआय सचिन नागपुरे, कॉन्स्टेबल सुमित जंगरा आणि महिला कॉन्स्टेबल सुनीता हलबर्गे यांनी सहभाग घेतला. बालकांच्या सुरक्षिततेसाठी आणि संरक्षणासाठी आरपीएफ, चाईल्ड हेल्पलाईन तसेच जिल्हा बाल संरक्षण यंत्रणांमध्ये समन्वय साधून ही कार्यवाही करण्यात आली.