पेपर रद्दी संकलनातून स्मशानभूमीत बोरवेल व हॅन्डपंपाचे लोकार्पण
पेपर रद्दी संकलनातून स्मशानभूमीत बोरवेल व हॅन्डपंपाचे लोकार्पण
नावेद पठाण मुख्य संपादक वर्धा
वर्धा वृक्ष सेवा समितीच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी टेकडीवरील भगवान बुद्ध व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले.
सन २०१७ पासून सर्वे क्रमांक १५९, सिंदी (मेघे) येथील स्मशानभूमीलगतच्या टेकडीवर सुमारे २००० झाडांची लागवड करून त्यांचे संगोपन साप्ताहिक श्रमदान शिबिराच्या माध्यमातून सुरू आहे. या झाडांच्या संवर्धनासाठी प्रत्येक कुटुंबाला सहभाग घेता यावा, यासाठी समितीने पेपर रद्दी संकलन उपक्रम राबविला.
या उपक्रमातून जमा झालेल्या निधीतून सिंदी (मेघे) स्मशानभूमीत ३५० फूट खोल बोरवेल खोदण्यात आली असून मोटार पंप, हॅन्डपंप, पाइपलाइन व स्टोअररूम आदी विकासकामांचे लोकार्पण जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजूरवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे, निवृत्त नेव्ही अधिकारी जगदीश हागोणे, माजी सैनिक श्यामभाऊ परसोडकर व पवन तिजारे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमानंतर टेकडीवर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले.
समितीचे अध्यक्ष निखिल सातपुते यांनी समितीच्या कार्यपद्धतीची माहिती देत आगामी संकल्प मांडले. लोकसहभागातून उभारलेल्या या प्रकल्पामुळे झाडांच्या संगोपनासाठी मुबलक पाण्याची व्यवस्था झाली असून भविष्यात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण करण्यास चालना मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांसाठी हॅन्डपंपाच्या माध्यमातून पाण्याची सोय उपलब्ध झाल्याने मोठी सुविधा निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाध्यक्ष अनिरुद्ध राजूरवार यांनी विदर्भासाठी वृक्षारोपण व संगोपन अत्यंत आवश्यक असल्याचे सांगत महापुरुषांच्या जयंतीनिमित्त लोकसहभागातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे कौतुक केले व पुढील सहकार्याचे आश्वासन दिले. जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष प्रवीण धोपटे यांनी वर्धेकरांनी मोठ्या प्रमाणात पेपर रद्दी दान करून या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन केले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते शिवजयंतीनिमित्त ८ फूट उंच आंब्याच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अध्यक्ष निखिल सातपुते, रवी नागपूरकर, अशोक भिवगडे, किशोर बाहे, राहुल गोल्हर, प्रदीप मेंढे, राजेश बोरसरे, किशोर बोकडे, गौरव चरडे, विशाल खनगण, मंगेश भोंगाडे, यशोधन देशपांडे, प्रवीण पेठे, अभय चौधरी, विशाल सुटे, महेश अडसूळे, विशाल मोहनानी, अमोल रामटेके आदी सदस्यांनी परिश्रम घेतले.