पुलगावच्या केतन बढिये यांची हिमालयात झेप; बीएमसी कोर्स यशस्वी, १६,५०० फूटांवरील Mount Rhenock शिखर सर
पुलगावच्या केतन बढिये यांची हिमालयात झेप; बीएमसी कोर्स यशस्वी, १६,५०० फूटांवरील Mount Rhenock शिखर सर
वर्धा जिल्हा विशेष प्रतिनिधी – युसुफ पठाण
पुलगाव : पुलगाव येथील युवा गिर्यारोहक केतन दिनेशराव बढिये यांनी हिमालयीन पर्वतरांगांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत बेसिक माउंटेनिअरिंग कोर्स (BMC) यशस्वीरित्या पूर्ण केला. हा कोर्स Himalayan Mountaineering Institute, दार्जिलिंग येथे पार पडला.
कोर्सदरम्यान केतन यांना सिक्कीममधील सुमारे ५,००० मीटर (१६,५०० फूट) उंचीवरील माऊंट रेनॉक हे शिखर सर करण्याची संधी मिळाली. या यशामुळे पुलगावसह संपूर्ण परिसरात अभिमानाची भावना व्यक्त होत आहे.
सह्याद्रीतून हिमालयाकडे
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये अनेक ट्रेक पूर्ण केलेल्या केतन यांच्यासाठी हिमालयातील अनुभव अत्यंत आव्हानात्मक ठरला. शून्याखालील तापमान, विरळ हवा आणि खडतर भूप्रदेशामुळे शारीरिक व मानसिक क्षमतेची कठोर परीक्षा झाली.
प्रशिक्षणाचा प्रवास
दार्जिलिंग येथे प्राथमिक प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर पथक सिक्कीमकडे रवाना झाले. युक्सोम येथे मुक्काम करून पुढील प्रवासास सुरुवात झाली.
१६ किमीचा ट्रेक करत त्शोका (१०,००० फूट), त्यानंतर द्झोंग्री (१३,२२० फूट) आणि पुढे बेस कॅम्प (१४,६०० फूट) गाठण्यात आले.
बेस कॅम्पवर रथोंग ग्लेशियर परिसरात आठ दिवस कठोर प्रशिक्षण देण्यात आले. यामध्ये आयस अॅक्स व क्रॅम्पॉन्सचा वापर, ग्लेशियर ट्रॅव्हल, आयस क्लायंबिंग, अँकर बेस तंत्र, फिक्स रोप व जुमार क्लायंबिंग, सेल्फ अरेस्ट, क्रेव्हास रेस्क्यू, मोहिमेचे नियोजन, मॅप रीडिंग व फील्ड कुकिंग अशा विविध तांत्रिक बाबींचा समावेश होता.
माऊंट रेनॉक सर
प्रशिक्षणानंतर अंतिम टप्प्यात माऊंट रेनॉक शिखर सर करण्यासाठी मोहिम हाती घेण्यात आली. उभ्या बर्फाळ भिंतीवर जुमार तंत्राचा वापर करत केतन यांनी यशस्वी चढाई पूर्ण केली. ५,००० मीटर उंचीवर पोहोचत त्यांनी भारतीय तिरंगा फडकावला.
“ज्या उंचीवर फार थोडे लोक पोहोचतात, त्या ठिकाणी उभे राहण्याचा अनुभव आयुष्यभर लक्षात राहील,” अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
गौरव व पुढील ध्येय
मोहिमेनंतर संस्थेत लेखी परीक्षा घेण्यात आली. पदवीदान समारंभात यशस्वी गिर्यारोहकांना ‘आइस अॅक्स’ बॅज प्रदान करण्यात आला.
केतन यांनी भविष्यात ६,००० मीटरपेक्षा उंच शिखरे सर करण्याचा निर्धार व्यक्त केला असून, एक दिवस एव्हरेस्ट शिखर सर करण्याचे स्वप्न असल्याचे सांगितले.
या यशाबद्दल पुलगावातील विविध मान्यवर व नागरिकांनी केतन बढिये यांचे अभिनंदन करून सत्कार केला. त्यांच्या या कामगिरीमुळे पुलगावच्या नावाला राष्ट्रीय पातळीवर नवे उंची प्राप्त झाली आहे.